Saturday, 19 November 2011

व्यसने


व्यसन माणसाला लागण्यामागे विविध करणे असतात. यातील काही करणे सामाजिक असतात तर काही कौटुंबिक तर काही व्यक्तिगत. तरुणांचा विचार करायचा झाला तर समवयस्कांचा आग्रह ज्याला आपण ‘पियर प्रेशर’ म्हणतो हे सगळ्यात महत्वाचे कारण असते. सगळे करतात तर एकदा करून तर बघुयात या विचारातून सिगारेट आणि दारूची सुरुवात होते. त्यातही सिगारेट आणि दारूला आता सामाजिक पातळीवरही स्थान मिळाले आहे. ते स्टेटस सिम्बॉल झाले आहे त्यामुळे तरुण वयात आपण करतो आहोत ते चुकीचे आहे हा विचारच अनेकांच्या मनात येत नाही. त्याचप्रमाणे जी मुले मानसिक पातळीवर कमकुवत किंवा सतत कुणावर तरी अवलंबून असण्याची संवय असणारी असतात त्यांना व्यसन चटकन जडते.
आई-बाबांशी भांडण झाले, मैत्रिणीशी जमत नाहीये, किंवा ती सोडून गेलीय.. परीक्षेत अपेक्षित मार्क मिळाले नाहीत, अशा कुठल्याही कारणांमुळे ज्या तरुणांना प्रचंड नैराश्य येतं किंवा मनावर ताण येतो असे तरुण व्यसनांकडे चटकन वळतात. आणि मग नैराश्य घालविण्यासाठी पुन्हा पुन्हा सिगारेट, दारू किंवा अंमली पदार्थांचा आधार घ्यायला लागतात. याला मानसशास्त्रीय भाषेत कोपिंग मेकॅनिझम म्हणतात. यात व्यक्तीवर ताण आणणारी किंवा निराशा निर्माण करणारी गोष्ट घडली की ती व्यक्ती कशाचा तरी आधार शोधते, हा आधार अनेकवेळा व्यसनांमधून मिळवण्याचा प्रयत्न होतो.
माणूस व्यसनी झाला असे आपण केव्हा म्हणतो ज्यावेळी त्या विशिष्ट गोष्टीवाचून त्याचे अडते, त्याची कार्यक्षमता कमी होते आणि दिवसच्या दिवस व्यक्ती फक्त व्यसनच करते.
व्यसन आणि मेंदूचा थेट संबंध असतो. मेंदूतील विविध रसायनांवर सिगारेट, दारू किंवा अंमली पदार्थांना वेगवेगळा परिणाम होत असतो. किंवा मेंदू या पदार्थांच्या सेवनामुळे निरनिराळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असतो. त्याला ‘ब्रेन रिवार्ड मेकॅनिझम’ असे म्हणतात. म्हणजे एखाद्या कृतीने किंवा पदार्थांच्या सेवनाने छान वाटल्यास ती क्रिया किंवा पदार्थांच्या सेवनाची मागणी मेंदू वारंवार करायला लागतो. ज्याला सामान्य भाषेत ‘कीक’ म्हटले जाते त्याच कीकची मागणी वाढायला लागते आणि माणसे व्यसनी होतात. दारू, सिगारेट आणि निरनिराळे अंमली पदार्थ यांचा मेंदूवर आणि शरीरावर निरनिराळा परिणाम होतो. नियमित दारू पिणाऱ्याने एखाद दिवशी दारू प्यायली नाही तर त्याचे हात-पाय थरथरायला लागतात. याला ‘विडरावल’ असे म्हणतात. जेव्हा माणूस एखाद्या विशिष्ट पदार्थाशिवाय काम करणे बंद करतो तेव्हा त्या व्यक्तीला उपचारांची नितांत आवश्यकता असते.
हल्ली सोशल नेटवर्कींग साईट्स, गेमिंग, ऑनलाईन गॅम्ब्लिंग, पोर्नोग्राफिक साईट्स यांचेही व्यसन तरुण पिढीला जडलेले दिसून येते. व्हर्च्युअल जगात रमण्यामागे अनेकदा व्यक्तिमत्वातले दोष कारणीभूत असतात. अशा व्यक्तींचे त्यांच्या इच्छांवर मुळीच ताबा ठेऊ शकत नाहीत. इच्छेवर नियंत्रण नसल्यामुळे इच्छा झाली की ती गोष्ट करायची याकडे त्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे व्हर्च्युअल जगात तुमचं अस्तित्व लपून राहते. तुम्ही नेटवर काय करता हे बघायला कुणीही नाही ह्या समजुतीतून तुम्हाला नेट आणि त्यावरील अनेक बाबींचे व्यसन लागले आहे ते कुणालाही कळणार नाही असाही ग्रह होतो. सगळे आभासी असते त्यामुळे तोटा काहीच नाहीनाशी एक मनाची समजूत होऊन बसते. पण अप्रत्यक्षपणे मानसिक पातळीवर होणारा तोटा कुणीच लक्षात घेत नाही.
मुलांच्या व्यसनांबद्दल आई-वडिलांची भूमिका यात अत्यंत महत्वाची आणि वस्तुनिष्ठ असणे फार गरजेचे असते. मुला-मुलींमधील व्यसने लक्षात आल्यावर आरडा-ओरडा करणे, टोकाची भूमिका घेणे टाळायला हवे. तरुण वयात एखाद्या गोष्टीला तुम्ही जितका जास्त विरोध कराल तितके त्याबद्दलचे आकर्षण वाढत जाते. त्यामुळे पालकांनी अतिरेकी भूमिका न घेता मुलांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्याचबरोबर आपली मुले व्यसनाधीन का झाली त्याची करणे शोधून त्यावर योग्य ते उपाय योजायला हवेत. औषधोपचार, पुनर्वसन आणि व्यसनमुक्ती कार्यक्रम यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती शक्य आहे.

- डॉ. रोहन जहागिरदार
मानसोपचार तज्ञ
पुणे
संपर्क:
मोबाईल – ९३ ७२४ १६ ४९१
क्लिनिक – (०२०) ३२४० ५७७०

1 comment:

  1. We are urgently in need of A , B , O blood group KlDNEY organs with the sum of $500,000.00 USD in Kokilaben Hospital India Contact For more details Email: kokilabendhirubhaihospital@gmail.com
    WhatsApp +91 7795833215

    ReplyDelete