Sunday, 30 October 2011

ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे?


ताण आपल्या सगळ्यांनाच येतो. त्या मागची कारणे निरनिराळी असली तरी जगण्याच्या विविध टप्प्यांवर ताणाला सामोरे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे. ताण येणे हे काही अंशी अपरिहार्य असले तरी ताणाला समर्थपणे तोंड देणे आपल्याच हातात असते. यासाठी मुळात ताणाचे व्यवस्थापन हा विषय समजून घेतला पाहिजे. काही वेळा आयुष्यात ज्या प्रसंगांमध्ये आपल्यावर ताण असतो त्यामुळेच खरेतर आपण त्या प्रसंगांमधून निभावून जातो. योग्य त्या पध्दतीने तो प्रसंग हाताळू शकतो. याचाच अर्थ असा होतो की ताण येणे, त्यातून येणारी अस्वस्थता योग्य परिस्थितीने निर्माण केलेली असेल तर त्याचा चांगला उपयोग स्वतःच्या प्रगतीकरिता करता येऊ शकतो. ताणामुळे आपली कार्यक्षमताही वाढू शकते.

पण हाच ताण जर जरुरीपेक्षा जास्त वाढला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या एकूण कार्यक्षमतेवर व्हायला लागतो. ताण अतिरिक्त स्वरुपात निर्माण झाला की त्याचा  शरीरावर आणि मनावर परिणाम होतो. ह्या परिणामांपासून स्वतःचा बचाव करणे आणि ताण निर्माण होणार नाही आणि झालाच तर त्यातून स्वतःला सावरायला शिकणे म्हणजेच ताणाचे व्यवस्थापन होय.
स्वसंवाद
तुम्ही जेव्हा ताणाखाली असता तेव्हा स्वतःला काय सांगता ह्यावर बरेच काही अवलंबून आहे. आपण सतत स्वतःशी बोलत असतो, आपल्या कळत-नकळत. हा जो काही स्वसंवाद आहे त्याला ताणाच्या व्यवस्थापनात अनन्य साधारण महत्व आहे. ताण येतो तेव्हा आपल्याला गोष्टी चांगल्या आणि वाईट ह्या दोनच चष्म्यातून दिसायला  लागतात.पण प्रत्यक्ष आयुष्यात तसे नसते. गोष्टी फक्त चांगल्या किंवा वाईट नसतात तर त्या अधे-मध्ये ही बरेच काही असते. त्याच प्रमाणे आपल्याला चांगल्या अनुभवांपेक्षा वाईट अनुभवांची आठवण अधिक असते. आपल्या बाबत घडलेल्या वाईट गोष्टी आपल्याला चटकन आठवतात, आठवतच राहतात. त्याचाही विपरीत परिणाम आपल्या मनावर होत असतो. आपल्याला घडलेली घटना वाढवून स्वतःकडे सांत्वनपर दृष्टीकोण खेचाण्याचीही वाईट संवय असते. ह्या सगळ्याचा आपल्या स्वसंवादावर परिणाम होत असतो. त्यामुळे ताणाचे नियोजन करीत असताना सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधायला सुरुवात केली पाहिजे.
अवघड प्रसंगात तुम्ही अडकले असाल तर ह्यातून आपण सुटू शकतो ह्या दिशेने विचाराची आणि स्वसंवादाची प्रक्रिया झाली पाहिजे. आता माझे कसे होणार, आता ह्यातून बाहेर कसे पडणार अशा विचारांना सुरुवात झाली तर ताण वाढत जाईल आणि समस्येतून बाहेर पडण्याचे मार्गही दिसेनासे होतील.
काळजी
आपल्याला सतत कसली ना कसली तरी काळजी वाटत असते आणि अनेकदा आपलं मन त्या काळजी करण्याच्या भावनेतच गुंतलेलं असतं. काळजी वाटणं वेगळं आणि काळजी करणं वेगळं. सतत अनावश्यक गोष्टींची काळजी केल्यामुळे गोष्टी बदलत नाहीत पण तुमच्यावरचा ताण मात्र अनावश्यक पद्धतीने वाढत जातो. त्यामुळे काळजी सोडा. जिथे करायला पाहिजे तिथे करा आणि त्या काळजीतून योग्य मार्ग सुचतात का याकडेही लक्ष द्या. विनाकारण  काळजी करण्याला काहीच अर्थ नसतो. ताणाचं व्यवस्थापन करत असताना अशी विनाकारण काळजी करणे सोडून द्यायला शिकलं पाहिजे.
नियोजन करा
बऱ्याचदा आपल्याला ताण येतो कारण आपण गोष्टींचं नियोजन केलेलं नसतं. अनियोजित गोष्टी आपल्या विचारांचा ताबा घेतात आणि मग त्यातून सुटायचं कसं या विचारांमागे आपण धावायला लागतो. फोकस हलतो आणि ताण येतो. ताणाचं व्यवस्थापन करत असताना आपल्या दिवसभरात करायच्या गोष्टींची यादी बनवा. त्यातही अग्रक्रम ठरवा. त्याप्रमाणे गोष्टी आधी पूर्ण करा आणि मग वेळ उरलाच तर इतर गोष्टींकडे लक्ष द्या. यामुळे होतं काय की तुमच्या अग्रक्रमातल्या गोष्टी पूर्ण होतात आणि गोष्टी अपूर्ण राहिल्यामुळे जो ताण आपल्या मनावर येतो तो टाळला जातो. दुसरं असं की ज्याला त्याला, ज्याची त्याची क्षमता माहित असते. आपण काय करू शकतो आणि काय नाही याचाही अंदाज असतो. अशावेळी उगीचच उरावर सतराशे साठ गोष्टी घेऊन ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. त्यापेक्षा स्वत:ला झेपेल, जमेल तितकंच कामाचं नियोजन करावं. हे नियोजन जितकं चांगलं तितका ताण कमी, म्हणजेच आपोआपच ताणाचंही नियोजन उत्तम होतं.
विसरणे.. लक्ष नसणे
आपले कान उघडे असतात पण कानावर येणाऱ्या गोष्टींपैकी निम्म्या अधिक आपण विसरून जातो. कुणी आपल्याला काहीतरी सांगत असतं पण आपलं त्याकडे लक्ष नसतं आणि मग त्यावर काही घडलं की त्याचा ताण अप्रत्यक्षपणे आपल्या मनावर येतो. त्यामुळे कमी बोलावं, नीट ऐकावं आणि जी गोष्ट करू त्याकडे पूर्ण लक्ष द्यावं म्हणजे ताणाचं व्यवस्थापन आपोआपच होतं.
करू बुवा नंतर !
चालढकल करणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. आज करे सो अब कर.. हे आपण नेहमीच विसरतो. आयत्या वेळेला वेळ मरून नेण्यात बहुतेकजण पटाईत असतात. आयत्या वेळेला काही करायला गेल्यास त्याचा सर्वाधिक ताण आपल्या मनावर येतो. जे करायचे ते वेळेत आणि उत्तम याचा आग्रहही प्रचंड ताण निर्माण करतो.
कारणंच कारणं
ताण आला, घटना आपल्या आणि इतरांच्या मनासारख्या झाल्या नाहीत की आपण कारणे सांगायला लागतो. पण त्यापेक्षा गोष्टी वेळेत केल्या, योग्य पद्धतीने आणि नियोजनपूर्वक केल्या तर ताण येत नाही आणि खरी खोटी कारणं सांगायची वेळही आपल्यावर येत नाही.
  
ताण येऊ नये म्हणून नियोजन -
१.      अग्रक्रमानुसार कामाची यादी बनवणे
२.      आवाक्याबाहेरचे अवास्तव धाडसी नियोजन करू नका
३.      नियोजन करायला आणि ते प्रत्यक्षात आणायला पुरेसा वेळ घ्या
४.      वेळेचं नियोजन करा
५.      महत्वाच्या कामाचे reminders set करा
६.      तुम्ही चुकलात तरी स्वत:ला दोष देत बसू नका आणि अपेक्षित यश मिळालं तर स्वत:चा वाजवी अभिमान बाळगा.

- डॉ. रोहन जहागिरदार
मानसोपचार तज्ञ
पुणे
संपर्क: ०२० – ३२४० ५७७०

1 comment:

  1. We are urgently in need of A , B , O blood group KlDNEY organs with the sum of $500,000.00 USD in Kokilaben Hospital India Contact For more details Email: kokilabendhirubhaihospital@gmail.com
    WhatsApp +91 7795833215

    ReplyDelete